नवी दिल्ली वृत्तसंस्था । तोडफोड करण्याचं समर्थन करणाऱ्या विचारधारेवर विश्वास आहे, केवळ भावनेच्या भरात शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचं व शेतकरी नेत्यांच्या नरमाईच्या भूमिकेवर संशय येत होता असे दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं.
शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल १४ दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली या चौकशीत पोलिसांना लाल किल्ल्यात पोहोचण्याचं प्लानिंगच सांगितलं. आपला कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचं समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, केवळ भावनेच्या भरात आपण शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं
सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईचं धोरण घेत होते, असा माझा संशय होता, असं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हतं. ऑगस्टपासून पंजाबात शेतकरी आंदोलन सुरू झालं आणि मी त्याकडे आकर्षित झालो, असंही तो म्हणाला.
शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी गेल्यावर तिथे त्याला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसला. त्यामुळे तो दिल्लीत दाखल झाला. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी निर्धारित मार्गावरून न जाण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यामुळे त्याने स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यासही त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले.
लाल किल्ल्यावर जातानाच शक्य झाल्यास इंडिया गेटवरही जाण्याचा आमचा प्लान होता. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यासाठी जुगराज सिंगला खास बोलावण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोटही त्याने केला.
सुखविंदर सिंग हा सुद्धा या आंदोलनात सरहभागी होता. तो लाल किल्ल्याच्या लाहौरी गेटवर दिसला होता. गाझीपूर बॉर्डरवर त्याने राकेश टिकैत यांची भेटही घेतली होती. चक्का जाम आंदोलनातही सहभागी झाला होता. त्याला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.
लक्खा सिधाना याचाही पोलीस शोध घेत आहे. लक्खा सिधाना सातत्याने लोकेशन बदलत असल्याने त्याला पकडणे मुश्किल झालं आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराजची लोकेशन कुंडली येथे दाखवली जात आहे. तो पाच दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये आल्याचं दिसून आलं होतं. आता त्याचं लोकेशन सिंधु बॉर्डर दाखवली जात आहे.