जळगाव प्रतिनिधी । जुने इमारतीचे बांधकाम दुसऱ्या मजल्यावर तोडतांना स्लॉबच्या कात्रीत सापडून ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आदर्शनगरात घडली. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांना एकच आक्रोश केला होता.
अधिक माहिती अशी की, आजाबराव रूपचंद चंदनकर (वय-४५) रा. रेणूका नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव हे जुने इमारती तोडण्याच्या कामाचे काम मजूर लावून करतात. शहरातील आदर्शनगरातील मुख्यरस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेजवळ एका जुनी इमारत तोडण्याचे काम घेतले आहे. गेल्या आठवड्यापासून इमारत तोडण्याचे काम सुरू आहे. आज दिवसभर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे तोडण्याचे काम सुरू होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ठेकेदार आजाबराव चंदनकर हे खुर्ची टाकून बसले होते. त्याच्या बाजूला दोन मजूर हॅमरींग मशीनने स्लॅब फोडत असतांना अचानक मोठा तडा गेल्यामुळे तो मध्यभागातून दुभंगला आणि त्या कात्रित आजाबराव चंदनकर ठेकेदार सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दौलत वंजरी (वय-२६) रा. धोबी वराड ता. पाचोरा हा मजूर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर बाजूच्या खोलीत काम करत असलेला मयताचा मुलगा राहूल चंदनकर यांने धाव घेवून वडीलांना बाहेर काढले. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती मिळताच जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी मन हेलवणारा आक्रोश केला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मान मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.