मुंबई : वृत्तसंस्था । उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली असून हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरली असा टोलाही तिने लगावला आहे.
मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात कंगनाला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने कंगनाची याचिका स्वीकारली असून पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द केली आहे. कंगनाविरोधात करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं सांगत उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारलंही आहे.
कंगनाने ट्विट करत म्हटलं आहे की, “जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले”.
महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. कंगनाने संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर म्हटलं होतं. त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. त्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई आपल्या वक्तव्याविरोधात असल्याचं सांगत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्यायालयाने निर्णय दिला आहे.
‘
“महापालिका अधिकाऱ्याकडून नोटीस काढणे, तिच्या बंगल्यावर चिकटवणे, कारवाईचा आदेश, कारवाईसाठी केलेली तयारी, सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न ४० टक्केच कारवाई होणं, संजय राऊत यांनी कारवाईनंतर उखाड दिया म्हणणं हे सर्व याचिकाकर्त्यांच्या दाव्याचं समर्थन करणारं आहे,” असं उच्च न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटलं.
मुंबई उच्च न्यायालयाने कंगना कार्यालयाचा ताबा घेऊ शकते असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी न्यायालयाने कंगनाला सरकारविरोधात मत व्यक्त करत असताना संयम बाळगावा असा सल्ला दिला आहे.