शहरात ज्या भागातील अमृत योजनेचे काम पूर्ण तेथेच रस्ते दुरुस्ती करावी

 

जळगाव प्रतिनिधी । शहरामध्ये अमृत योजनेचे काम ज्या ठिकाणी पूर्ण झाले असेल त्याच ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. जर अर्धवट काम झालेल्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम केले तर, त्याच्यावर डबल निधी खर्च होऊ शकतो त्यात मनपाच्या पैशांचा चुराडाच होईल व त्याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागातील अभियंत्यांवर राहील, याची दाखल घ्यावी. अशा आशयाचे निवेदन स्थायी समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्व १९ प्रभागात प्रत्येकी ५० लाख रुपयांची रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, शहरात अमृत योजना १०० टक्के आहे. व मलनिस्सारण योजनाचे काम शहरात चार फेजमध्ये आहे. यात शासनाने पहिल्या टप्यालाच मान्यता दिली आहे. याचे काम काही प्रभागातच युद्ध पातळीवर सुरु असून जेथे काम पूर्ण झाले असेल तेथेच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. असे न झाल्यास मनपाचा डबल खर्च होऊ शकतो. अमृत योजनेसाठी नेमलेल्या मक्तेदाराकडून जेथे काम पूर्ण होईल तेथे रस्ते दुरुस्तीची जबाबदारी त्या एजन्सीकडे असतांना मनपा डबल खर्च का करीत आहे. याचे कारण द्यावे. अमृत योजनेचे काम सुमारे ६० टक्के झाले असून सत्ताधारी पक्षाने ते पूर्ण कसे होईल याकडे लक्ष दयावे. मलनिस्सारण योजना देखील ५० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा न करता सत्ताधारी पक्ष मक्तेदारांना खुश करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप देखील प्रशांत नाईक यांनी केला आहे.

सर्व प्रभागांमध्ये खड्डे बुजणे आणि अमृत योजने अंतर्गत चारी बुजणे या खाली नवीन रस्ते करण्यास हरकत नाही मात्र, रास्ता झाल्यावर पुन्हा अमृत योजनेचे किंवा इतर कारणे देऊन खोदकाम करून नका अन्यथा त्याची जबाबदारी अभियंत्यांवर राहील असा इशारा देत प्रशांत नाईक म्हणाले की, शहरातील वाढीव परिसरात कच्चे रस्ते देखील नाहीत. मात्र, या रस्त्यांचा विचार केला जात नाही. अशी खंत देखील त्यांनी माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे.

Protected Content