नवी दिल्ली । जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये वाजपेयींचा सल्ला ऐकला नाही, तर आमचे तुम्ही कुठे ऐकणार? ऐंकण, शिकणं आणि राजधर्माचे पालन करणे हे गुण तुमच्या सरकारमध्ये नसल्याचा टोला माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारला राजधर्माचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राजधर्मावरुन आरोप-प्रत्यारोपाचे जोरदार राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसने राजधर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम करु नये, असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद शुक्रवारी म्हणाले. त्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कायदा मंत्री काँग्रेसने राजधर्म शिकवू नये असे सांगतात. आम्ही तुम्हाला कसे शिकवू शकतो? जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये वाजपेयींचा सल्ला ऐकला नाही, तर आमचे तुम्ही कुठे ऐकणार? ऐंकण, शिकणं आणि राजधर्माचे पालन करणे हे गुण तुमच्या सरकारमध्ये नाहीत असे ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे.