तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात

 

 

कोल्हापूर: वृत्तसंस्था । ‘चंद्रसूर्याचं कशाला घेऊन बसलात? तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल,’ असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना हाणला आहे.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ आज १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम करत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी चंद्रसूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, असं म्हणाले होते.

‘कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर सतत अन्याय करत आहे. हा अन्याय यापुढं खपवून घेतला जाणार नाही. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी त्यांना समजावून सांगावे,’ असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आज काळ्या फिती बांधून सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्या. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू!,’ असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.

‘सीमा भागातील मराठी भाषिकांची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही आमच्या हक्कांची आणि अधिकाराची लढाई आहे. बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी लोकांची महाराष्ट्रात येण्याची भावना असेल तर त्यांच्या भावनांचा आदर व्हायला पाहिजे. आंध्र व केरळमध्ये काही कन्नड लोक राहत असतील आणि त्यांना कर्नाटकात यायचं असेल तर त्यांच्याही भावनांचा आदर झाला पाहिजे. देश हा एकच आहे आणि राहील. सीमा भागातील लोक देशाच्या विरोधात आवाज उठवत नाहीत. मात्र, देशात भाषावार प्रांतरचना झाली आहे. त्यानुसार ते ते भाषिक लोक आपापल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर न्यायालय, कायदा व राज्य सरकारने त्यांच्या इच्छेचा सन्मान करायला हवा,’ असं संजय राऊत म्हणाले. चंद्रसूर्याचे ज्ञान आम्हाला शिकवू नका, असंही त्यांनी सावदी यांना सुनावलं.

Protected Content