डेहराडून : वृत्तसंस्था । चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच सूत्रे स्वीकारणार आहे. आज झालेल्या भाजपाच्या बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली.
उत्तराखंडमध्ये काही दिवसांपासून राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली होती. त्यातच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचंही समोर आलं होतं. या चर्चा सुरू असतानाच रावत यांची मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.
रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा सुरू होती. यात चार नावे स्पर्धेत असून, त्यापैकी एका नावाची निवड केली जाऊ शकते, असं वृत्त होतं. मात्र भाजपाच्या देहरादून येथे झालेल्या बैठकीत चारही नावे बाजूला ठेवण्यात आली आणि तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली. तीरथ सिंह रावत आज सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. खासदार तीरथ रावत हे उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. रावत सध्या भाजपाचे राष्ट्रीय सचिव आहेत.
रावत यांच्या राजीनाम्यानंतर चार नावांची चर्चा सुरू होती. यात रावत यांच्या मंत्रिमंडळात असलेले धनसिंह रावत, लोकसभा खासदार अजय भट्ट, राज्यसभा खासदार अनिल बलूनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, भाजपा संसदीय मंडळाकडून तीरथ सिंह रावत यांच्याकडे देवभूमीची सूत्रं देण्याचा निर्णय घेण्यात आला.