जोधपूर : वृत्तसंस्था । तीन वेळा प्रयत्न करूनही तांत्रिक बिघाडामुळे जैसलमेर विमानतळावर विमान उतरू न शकल्याने ते अखेरीस अहमदाबादला परत न्यावे लागले . शनिवारी या विमानातील प्रवाशांना हा थरारक अनुभव आला .
कुणासोबत कधी काय घडेल, हे कधीच सांगता येणार नाही. कधीकधी असं काहीसं घडतं की ज्याची आपण कधीच कल्पनाही केली नसेल. असाच काहीसा अनुभव शनिवारी अहमदाबाद-जैसलमेर फ्लाईटमध्ये बसलेल्या प्रवाशांना आला. पायलटने त्यांचं विमान राजस्थानच्या जैसलमेर विमानतळावर लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तांत्रिक कारनास्तव ते लँड होऊ शकलं नाही. पायलटने पुन्हा लँड करण्याचा प्रयत्न केला. पायलटने पुन्हा आकाशात झेप घेतली. त्यानंतर पुन्हा विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा तीच समस्या झाली. त्यामुळे दुसराही प्रयत्न अयशस्वी ठरला. पायलटने पुन्हा तिसरा प्रयत्न केला. पण तिसराही प्रयत्न यशस्वी न झाल्याने विमानाला अहमदाबादला आणलं गेलं. यावेळी प्रवाशांची झालेली मानसिक अवस्था शब्दातही मांडता येणार नाही
स्पाईसजेटचं एसजी 3012 फ्लाईटने शनिवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी अहमदाबादच्या विमानतळावरुन जैसलमेरच्या दिशेला उड्डाण घेतली. हे विमान जवळपास दुपारी एक वाजेच्या सुमारास जैसलमेरच्या विमानतळाजवळ पोहोचलं. पायलटकडून तीनवेळा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला गेला. मात्र, तांत्रिक कारणामुळे विमानाचं लँडिंग होऊ शकलं नाही .
जैसलमेरच्या विमानतळाजवळ विमान जवळपास एक तास हवेत घिरक्या मारत होतं. तरीही पायलटने धीर सोडला नाही. त्यानंतर पुन्हा अहमदाबादला विमान नेण्यात आलं. तिथे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी दुसऱ्या पायलटद्वारे पुन्हा जैसलमेरच्या दिशेला विमानाने उड्डाण घेतली. तिथे संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आली. तेव्हा प्रवाशांनी सूटकेचा श्वास सोडला.
पायलटने विमान तीन वेळा लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. ते विमान तीन वेळा आकाशात झेपावलं. जवळपास तासभर विमान आकाशात घिरट्या मारत होतं. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. प्रवासी प्रचंड चिंतातूर झाले. काही प्रवासी तर अक्षरक्ष: रडायला लागले. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या जास्त होती. या सर्व भयावह परिस्थितीत वैमानिकाने धैर्य सोडलं नाही.