कोरोनामुळे अहमदाबादेत संचारबंदी

 

अहमदाबाद : वृत्तसंस्था । गुजरातच्या अहमदाबाद शहरातदेखील करोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून अखेर शहरात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या आठ ते १० महिन्यांपासून भारतात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रभाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन काळात केलेल्या संचारबंदीमुळे काही अंशी रूग्णवाढीच्या वेगाला आळा बसला होता, पण आता लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यानंतर पुन्हा एकदा देशातील मोठ्या शहरांत बाधितांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली आहे.

गुजरातमधील व्यापाऱ्याच्या दृष्टीने गजबजलेलं शहर म्हणून ओळख असणाऱ्या अहमदाबादमध्ये शुक्रवार रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात केवळ दूधविक्री केंद्र आणि मेडिकल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारनंतरही रात्रीच्या काळात संचारबंदी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढती रूग्णसंख्या पाहता त्यांनी रात्रीच्या काळात संचारबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळातच शुक्रवार रात्र ते सोमवारी सकाळ संपूर्ण संचारबंदीचाही निर्णय जाहीर करण्यात आला .

 

याशिवाय, शहरातील शाळा खुल्या करण्याच्या निर्णयावरही स्थगिती देण्यात आली आहे. गुजरात सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण आता तो आदेश मागे घेण्यात आला आहे.

Protected Content