गुवाहाटी : वृत्तसंस्था । अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून भारतातील लोकही तालिबानचे समर्थन करत आहेत. यूपी, दिल्ली, आसामसह काही राज्यांतून सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, आसाम पोलिसांनी १४ तालिबान समर्थकांना अटक केली आहे.
सोशल मीडियावर अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आसाममध्ये १४ जणांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून या अटक करण्यात आल्या आणि त्यांच्यावर बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी ट्वीट करत सोशल मिडीयावर पोस्ट करतांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफगाणिस्तान तालिबान वादावर पोस्ट लाईक करतांना देखील सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. जीपी सिंह म्हणाले, आसाम पोलिसांनी तालिबानी कारवायांशी संबंधित सोशल मीडिया पोस्टसाठी १४ लोकांना अटक केली आहे ज्यांनी बेकायदेशीर पोस्ट केल्या आहेत.
आसाम पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियावर सतर्क आणि देखरेख करत आहोत. मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली. दरांग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली.