पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील ग्रामपंचायतीचे सरपंच हे उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नाही म्हणून सरपंचा अविश्वास ठराव करण्यात आला होता. आज गुरूवारी १३ एप्रिल रोजी सरपंचा विरुध्द ७/१ असा अविश्वासाचा ठरावास तहसिलदार प्रविण चव्हाणके यांनी मंजुरी दिली आहे.
पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे ९ सदस्यांची ग्रामपंचायत असुन गेल्या दोन वर्षांपासून सरपंच स्वाती नवल गुजर ह्या मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नाही, तसेच गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात. या कारणांमुळे उपसरपंच सुनिल रमेश सोनवणे, सदस्या आशाबाई रोहीदास मराठे, आशाबाई संजय गोसावी, संगिता राजेंद्र पाटील, सदस्य देविदास कौतिक पाटील, मधुकर दौलत पाटील, अनिल जुलाल पाटील अशा उपसरपंचासह ७ सदस्यांनी सरपंच स्वाती नवल गुजर यांचे विरुध्द अविश्वास ठराव केला होता. या प्रकरणी १३ एप्रिल रोजी तहसिलदार प्रविण चव्हाणके यांनी तारखेडा खु” ग्रामपंचायत कार्यालयात जावुन माहिती जाणुन घेत सरपंच स्वाती नवल गुजर यांचे विरुध्द ७/१ असा अविश्वास ठराव मंजूर केला आहे. याप्रसंगी ७ सदस्यांसह ग्रामसेवक समाधान पाटील हे उपस्थित होते. तर उर्वरित एक सदस्या कल्पनाबाई रघुनाथ पाटील ह्या प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर होत्या. यावेळी ग्रामपंचायत परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे, प्रकाश पाटील, यशवंत पाटील हे देखील उपस्थित होते.