जामनेर प्रतिनिधी । तळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस परीक्षेत घवघवीत यश मिळविले. यात सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१९ (एनएमएमएस) ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली. नुकताच तिचा निकाल घोषित करण्यात आला असून तळेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचे ६ विद्यार्थी यात उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पाच विद्यार्थिनींचा समावेश आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रोशन संतोष घोरपडे, प्रतीक्षा भास्कर करवंदे, सारिका गौतम सुरवाडे, पूजा विलास वाघ, दीक्षा गौतम सुरवाडे, निकिता प्रताप घोरपडे यांचा समावेश आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी वर्गशिक्षक नंदकिशोर शिंदे, विनोद पाटील, गोपाल पाटील, विजय वाघ, शाळेचे मुख्याध्यापक मनोज सिंग राजपूत यांचेदेखील अनमोल सहकार्य लाभले.
पालकांच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या सतत अभ्यासाने व मेहनतीने हे यश मिळवले आहे असे वर्गशिक्षक शिंदे सरांनी सांगितले.या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना प्रति वर्ष रुपये १२ हजार याप्रमाणे नववी ते बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच या परीक्षेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रविष्ट केले होते. आणि या पुढील वर्षी देखील अधिक विद्यार्थ्यांना सदर परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.