मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना चांगलेच सुनावले आहे. योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारच राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून दिला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल, तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केली.