मुंबई प्रतिनिधी । माझ्या भाषणात अडथळा आणणारा पुन्हा निवडून येत नसल्याचे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आव्हान देत आपल्याला पाडून दाखवण्याचे खुले आव्हान दिले.
आज विधानसभेत मुनगंटीवार आणि अजित पवारांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचार्यांचे पैसे दिले, पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते.
त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केलं.
दरम्यान, आज सुधीर मुनगंटीवार यांनी विविध मुद्यांवरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, ऑक्सफर्ड विद्यापीठात रसेल फॉस्टर नावाचा एक अभ्यासक आहे. त्याने एक सिद्धांत मांडला आहे, की तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो. म्हणजेच महिन्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. माझा, तुमचा (अजित पवार), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म महिना जुलै आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली. अशी फटकेबाजी सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.