मुंबई प्रतिनिधी । प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाचे उध्दव ठाकरे यांनी दिलखुलासपणे स्वागत करून त्या हुकुमाची राणी सिध्दी होऊ शकतात असे भाकीत केले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनात आज हुकुमाची राणी या शीर्षकाखालील अग्रलेखात उध्दव ठाकरे यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे. यात म्हटले आहे की, प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या-बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टयात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने रॉबर्ट वढेरांची दडपलेली प्रकरणे वेगात बाहेर येतील ही भीती असतानाही प्रियंकाने मैदानात उडी मारली. आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी लपवाछपवी न करता सांगितले. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल.
या अग्रलेखात पुढे नमूद केले आहे की, राहुल गांधी अपयशी ठरले म्हणून प्रियंकाला आणावे लागले अशा वावडया उठवल्या जात आहेत. त्यात दम नाही. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. राफेलसारख्या विषयावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. हे एकवेळ सोडा, पण तीन महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेसने भाजपकडून सत्ता खेचून घेतली व त्यामुळे मृतवत काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्याचे श्रेय त्यांना न देणे हे कोत्या वृत्तीचे लक्षण आहे. नेहरू-इंदिरा गांधी यांच्याविषयी भाजप नेतृत्वाने मनात अढी बाळगली, कारण हेच कुटुंब भाजपास आव्हान देऊ शकते व २०१९ ला निदान बहुमताचा आकडा गाठण्यात अडथळा ठरू शकते ही भीती आहेच. हे सत्य असल्याचे नमूद करत यात भाजपला टोलादेखील मारण्यात आला आहे.