चोपडा शिवसेनेतील वाद चिघळला; आता माजी आमदारांवर आरोप

चोपडा प्रतिनिधी । येथील शिवसेनेतील वाद चिघळला असून आता आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार कैलास पाटील हे गद्दार असल्याचा आरोप केला आहे.

यांनी घेतली पत्रकार परिषद

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात माजी आमदार कैलास पाटील यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याला दुसर्‍याच दिवशी आमदार समर्थकांनी उत्तर दिले. पंचायत समितीचे सदस्य भरत बाविस्कर व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत कैलास पाटील यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. याप्रसंगी चोसाकाचे माजी संचालक अ‍ॅड. एस. डी. सोनवणे, जि.प. सदस्य हरीश पाटील, महिला आघाडीच्या रोहिणी पाटील, प्रा. शरद पाटील, गटनेते महेश पवार, किशोर चौधरी, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, गोपाल पाटील, सुकलाल कोळी, विक्की शिरसाठ, प्रकाश राजपूत, दीपक चौधरी, जगदीश मराठे, विजय देशमुख आदी उपस्थित होते.

कोणत्याच कार्यक्रमात सहभागी नाहीत

याप्रसंगी राजेंद्र पाटील म्हणाले की, कैलास पाटील हे दोन वर्षांपासून शिवसेनेच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. पक्षाचे मंत्री, नेते, उपनेते, संपर्कप्रमुख चोपड्यात येतात, तेव्हा कोणत्याच कार्यक्रमात माजी आमदार कैलास पाटील उपस्थित राहत नाहीत. त्यांना जळगाव व धरणगावची शिवसेना चालते. मात्र, चोपड्याची शिवसेना चालत नाही. त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत सेनेच्या विरोधात प्रचार करुन उमेदवार पराभूत केले, असाही आरोप करण्यात आला. भरत बाविस्कर यांनी सांगितले की, कैलास पाटील यांची राष्ट्रवादीशी सलगी झाली आहे. शहरप्रमुख आबा देशमुख यांनी सांगितले की, विधानसभा उमेदवाराचे तिकीट आणण्याचे काम जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख करतात आणि उमेदवार चंद्रकात सोनवणे हेच राहतील. पालिकेचे गटनेते महेश पवार यांनी सांगितले की, कैलास पाटील यांनी काँग्रेसच्या डॉ. स्मिता पाटील यांचे नाव लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जाहीर केले होते. सेनेचे माजी आमदार कैलास पाटील हे काँग्रेसचे उमेदवार जाहीर करतात, त्यामुळे तेच खरे गद्दार आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना रस्त्यावर उतरणार

चोसाकाचे माजी संचालक अ‍ॅड. एस. डी. सोनवणे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना काट्याखाली पैसे देऊस असे आश्‍वासन कैलास पाटील यांनी दिले होते. आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे २० कोटी ८० लाख रुपये थकीत असून तालुक्यात शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. त्यांनीदेखील कैलास पाटील यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.

Add Comment

Protected Content