मुंबई: वृत्तसंस्था । ‘सरकारकडं खरंच हृदय असेल व मनात खरंच शेतकऱ्यांबद्दल आपुलकी असेल तर गृहमंत्री किंवा पंतप्रधान स्वत: जाऊन त्यांच्याशी बोलतील,’ असंही ते म्हणाले.
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. अनेक राजकीय पक्ष देखील शेतकऱ्यांच्या बाजूनं मैदानात उतरल्यानं बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनंही बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
‘आजचा बंद उत्स्फूर्त आहे. हा राजकीय बंद नाही. ही आमची भावना आहे. त्या भावनेतून आम्ही बंदला पाठिंबा दिलाय. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन तिथे उभे नाहीत. त्यामुळंच त्यांच्या मागे एकजुटीनं उभं राहणं व त्यांच्या भावनांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या बाजूनं कुठलंही राजकारण नाही. समोरूनही ते केलं जाऊ नये,’ असं संजय राऊत म्हणाले.
‘भारत बंद’ला महाविकास आघाडीचा पाठिंबा हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. त्यांच्या या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. ‘कशाचीही पर्वा न करता शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. छातीवर गोळ्या झेलण्यासही तयार आहे. तो या भूमिकेपर्यंत का आला याचा विचार विरोधी पक्षनेत्यांनी करायला हवा. त्यांनी शांतपणे विचार केला तर तेही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील, असा चिमटाही राऊत यांनी काढला.