तरूणाचा चाकूने खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (वय-२५) रा. तेहासी ता. खागा जि. फतेहपूर (उत्तर प्रदेश) ह.मु. शांती नारायण नगर, मेहरूण असे आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील हरसूद तालुक्यातील कुंडिया येथील मूळ रहिवासी आसाराम छोटेलाल पवार (वय-३०) हे मेहरुन परिसरातील मंगलपूर भागात वास्तव्यास होते. ६ फेब्रुवारी २०११ रोजी सुरेश बंजारा यांचे काही लोकांशी भांडण सुरु असल्याने आसाराम पवार याने त्यांचे भांडण सोडवासोडव केली. यामध्ये सुरेश बंजारा यांचे जावाई कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत याने त्याच्या हातातील चाकू आसाराम याच्या छातीत मारुन गंभीर जखमी केले होत. जखमी अवस्थेत आसारामचा भाऊ दिनेशराव याने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान असारामचा मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर कल्लूसिंग राजपूत हा फरार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी कल्लूसिंग राजपूत व जितेंद्रसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०११ रोजी दोघांना अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्यात दोघांवर खूनाचे कलम वाढविण्यात आले होते. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात सुरु होता. खटला सुरु असतांना तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. ए. कदम यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. खटला न्यायालयात सुरु असतांना सरकारपक्षाकडून याप्रकरणी १४ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये मयत आसाराम याची पत्नी, भाऊ, संशयीत आरोपीची सासू, सासरे व मृत्यूपूर्वी जवाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम खैरनार, डॉ. किरण पाटील, डॉ. उमेश वानखेडे व तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. ए. कदम यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाने १४ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरवित न्यायालयासमोर सादर केलेल्या पुरव्यांच्या आधारावर न्यायालयाने संशयीत आरोपी कल्लूसिंग राजपूत याला खून केल्याप्रकरणी जन्मठेप व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ३ महिने साधीकैदेची शिक्षा सुनावली. तसेच दुसर्‍या संशयीत आरोपीस जितेंद्रसिंग राजपूत याला निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील प्रदीप एम. महाजन यांनी प्रभारी युक्तीवाद केला. याकामी पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content