डॉ. कलाम पुस्तक भिशी अंतर्गत सभासदांच्या पाल्यांच्या गुणगौरव

जळगाव, प्रतिनिधी  । ‘गुणवंत विद्यार्थ्यांनी अखंड मूल्याधिष्ठीत वर्तन ठेवणं हा मायबापांच्या संस्कारांचा अपत्यांनी दिलेला सर्वोत्तम परतावा’  असे भावोद्गार निवृत्त शिक्षण उपसंचालक नीळकंठ गायकवाड यांनी काढले. भारतरत्न डॉ. ए . पी . जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे भिशी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. 

दि. ४  ऑगस्ट २०२१ रोजी शाहूनगर येथील अथर्व पब्लिकेशनच्या कार्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते  बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधकी साहित्य परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल व डॉ. विजय बागुल उपस्थित होते.

गायकवाड  पुढे म्हणाले की ,’गुणवंतांनी स्वतःला शाबूत ठेवण्यासाठी स्वतःवर  स्वतःच नैतिक बंधन घातली की उर्वरित  रिक्त अवकाशात मुक्तपणे पोहून जीवनानंद घेता आला पाहीजे.  रोज स्वतःला नव्या रुपात सिद्ध करा यासाठी रोज अद्ययावत  प्रचंड वाचन करणे अपरिहार्य आहे.

शालांत परीक्षा इयत्ता दहावीमध्ये ८९ . ४ % गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळवलेली ओरियन सी. बी.एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल जळगावची विद्यार्थिनी तथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगाव कोषाध्यक्ष युवराज माळी यांची सुपुत्री कुमुद माळी हीचा शाल, श्रीफळ व बुके देऊन नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.  ९६ . १ % गुण पटकावून रा . का . मिश्र विद्यामंदिर बहादरपुर ता. पारोळा शाळेत प्रथम क्रमांकाने उतीर्ण झालेला  विद्यार्थी  तथा भिशी सदस्य प्राथमिक शिक्षक सुदाम बडगुजर यांचे सुपुत्र प्रफुल्ल बडगुजर याचा शाल , श्रीफळ व बुके देऊन निवृत्त माध्यमिक उप शिक्षणाधिकारी  सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात माता-पित्यांचा मार्गदर्शनात्मक सहभाग कसा मिळाला याबाबत भावना व्यक्त करीत आपले यश माता-पित्यांना समर्पित केले.  सिद्धार्थ नेतकर म्हणाले की, ‘आयुष्य घडवणारे तीन  गुरु आहेत : वाचलेली पुस्तके ,भेटलेली माणसे आणि आलेले अनुभव.’ साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल मार्गदर्शनात म्हणाले की ,  ‘महाविद्यालयीन जीवनापर्यंत विद्यार्थी बापाच्या नावाने ओळखला जातो नंतर  मुलाच्या नावाने बाप ओळखला गेला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी संस्कार व तत्वनीष्ठ सदाचाराने पदोपदी निरंतर वागले पाहिजे’.  भुसावळ हायस्कूल भुसावळचे मुख्याध्यापक नितीन धांडे  म्हणाले की , ‘गुणवत्तेला क्रिडा व कलेची जोड असलीच पाहिजे म्हणजे  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्यामुळे  विद्यार्थी पुढील  प्रतिकूल परिस्थितीत कधीच अविचाराने वागून आत्मघात करत नाही.’  तीर्थस्वरूप गायकवाड साहेबांच्या हस्ते सत्कार होण म्हणजे विद्यार्थ्यांचे परमभाग्य अशी भावना डॉ. विजय बागूल यांनी व्यक्त केली.  सत्कारार्थी पाल्यांच्या पालकांतर्फे सुदाम बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले.  सत्कार प्रसंगी अथर्व प्रकाशनाचे संचालक तथा प्रकाशक युवराज माळी , कुमूद प्रकाशनाच्या संचालिका  संगिता माळी , पत्रकार दीपक महाले,  दीपक साळुंके, शरद महाजन उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय लुल्हे व आभार  एस. एस . बडगुजर यांनी मानले.

 

Protected Content