मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सेसच्या मानधनात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित डॉक्टरांची योग्य काळजी घेतली जाणार नसेल तर ते योद्धे आहेत या विधानाला काही अर्थ राहणार नाही, असे म्हटले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्याकाळात ‘डॉक्टर हेच देव’ असल्याचा आपल्याला अनुभव येत आहे. विशेषत: राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच ठरतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनात कपात करणे कुठल्याही दृष्टीने पटणारे नाही” असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. आरोग्य सेवकांच्या परिश्रमाचं मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं. मानधन कमी करून नाही. अन्यथा करोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर व परिचारिका हे योद्धे आहेत, या विधानाला कोणताही अर्थ राहणार नाही,असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. हाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय यांनी २० एप्रिल २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात २० हजारांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुण डॉक्टरांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असून त्यामुळे बंधपत्रित वैद्यकीय डॉक्टरांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे” असे अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.