लखनौ : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधील मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदने मदरसा अरबिया प्रमुखांच्या बैठकीनंतर फर्मान जारी केला आहे. सर्व मदरश्यांच्या प्रमुखांशी चर्चा करुन मुस्लिमांच्या लग्नात डीजे वाचवला जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या लग्नामध्ये डीजे वाजवण्यात येतील किंवा निकाह ठरवण्यासाठी काझी गेले असता तिथे डिजेची व्यवस्था असेल तर काझी निकाहनामा वाचणार नाहीत, डीजेची व्यवस्था असतानाही एखाद्या काझीने निकाहनामा वाचला तर त्याला समाजातून बहिष्कृत करण्यात येईल असंही बैठकीनंतर घोषित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये म्हटलं आहे.
मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष असणाऱ्या मौलाना नजम अली खान यांनी मुस्लीम समाजातील लग्नांसंदर्भातील काही नियम ठरवण्यात आल्याची माहिती दिली. हुंडा मागणे, कार्यक्रमामध्ये उभं राहून जेवणं, डीजे वाजवणं तसेच लग्नामध्ये फटक्यांची आतिशबाजी करणाऱ्यांविरोधात निकाह लावणाऱ्या धर्मगुरुंनीच मोहीम सुरु केली असून याची सुरुवात मिर्झापूरपासून केली जात असल्याची माहिती मौलाना नजम अली खान यांनी दिली.
आधी लोकांना शरीयतच्या नियमांनुसार निकाह करण्यासंदर्भात सांगण्यात येईल. मात्र त्यानंतरही त्यांनी नकार दिल्यास कोणतेच काझी निकाहनामा वाचणार नाहीत. एखाद्या ठिकाणी काझींना या व्यवस्थांसाठी सोय केल्याचं दिसलं तर ते निकाह न लावताच तिथू निघून जातील एखाद्या काझीने नियमांचे उल्लंघन करुन निकाह लावून दिला तर त्याला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करण्यात येईल. शरीयत नियमांचे पालन केलं जावं आणि वायफळ खर्च कमी करण्यात यावा या हेतूने हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मौलानांनी दिली आहे. लग्नावर वायफळ खर्च करणं इस्लामच्या नियमांनुसार चुकीचं आहे असंही मौलाना खान यांनी स्पष्ट केलं.
मुस्लीम समाजामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी लग्नामध्ये होऊ लागल्या आहेत, या मुद्द्यावर बैठकीमध्ये गहण चर्चा करण्यात आली. या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. शरीयतच्या नियमांनुसार या साऱ्या गोष्टी हराम आहेत. त्यामुळेच या बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीने अशा गोष्टी करणाऱ्या मुस्लिमांची लग्न लावून देण्यात येऊ नयेत असा निर्णय घेण्यात आलाय.