डांभुर्णी निर्घृण हत्या प्रकरण : आरोपीला नेताना पोलिसांच्या वाहनावर दगडफेक !

जळगाव प्रतिनिधी । डांभुर्णी येथील अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली होती. यातील संशयित आरोपीला आज अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मात्र संशयित आरोपीस जळगाव येथे आणत असताना डांभुर्णीकरांनी पोलीसांच्या वाहनांवर दगडफेक केल्याचा प्रकार आज ११ वाजेच्या सुमारास घडला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेय.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा कैलास चंद्रकांत कोळी याचा मृतदेह डांभूर्णी शेतशिवारात शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास आढळून आला होता. मृताच्या डोळ्यांमध्ये काड्या खुपसून आणि डोक्यात दगड आणि विटांनी मारहाण करून खून केलेला होता. कैलासचा मृतदेह हा गावातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात आढळून आला होता. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान रात्री उशीरापर्यंत यावल पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एलसीबीकडून संशयित आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशयित आरोपी यश चंद्रकांत पाटील (वय-२६) रा. डांभुर्णी ता. यावल हा गावातीलच शेतकरी सुपडू रमेश साळुंखे यांच्या कोळन्हावी शेतशिवारात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित आरोपी यश पाटील याला शेतातून आज सकाळी ताब्यात घेतले.

गावातील सरपंच व पोलीस पाटलांवर ग्रामस्थांचा रोष
संशयित आरोपी यश पाटील याने यापुर्वी देखील असाचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काल घडलेल्या हत्याप्रकरणामागे संशयित आरोपीचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज होता. घटना घडल्यानंतर डांभुर्णीकरांनी सरपंच गुरूजित चौधरी आणि गावातील पोलीस पाटील यांच्यावर रोष व्यक्‍त केला. मात्र संशयित आरोपी हा मनोरूग्ण असल्याचे सांगण्यात येत होते, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, पोलीस पाटील आणि सरपंच यांना देखील या खून प्रकरणात सहआरोपी करावे, अन्यथा मृतदेहावर अंतिमसंस्कार करणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याचेही कळते.

पोलीसांच्या गाडीवर दगडफेक
आज सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी यश पाटील याला अटक केली. संशयित आरोपीस एलसीबीने ममुराबादमार्गे जळगाव येथे नेत असतांना ममुराबाद येथे पोलीसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने ग्रामपंचायत तोडफोड केल्याची घटना घडली असून आज देखील संतप्त नागरिकांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट :* https://livetrends.news

फेसबुक पेज :* https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक :* ९३७०४०३२००

Protected Content