भुसावळ प्रतिनिधी । अमृत योजनेच्या जलवाहिनीचे काम करणारा ठेकेदार चक्क महावितरणच्या तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार जनआधारच्या नगरसेवकांनी उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील नेब कॉलनीत अमृत योजनेच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. यात विविध इलेक्ट्रीक उपकरणे चालवण्यासाठी वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार नगरसेवक रवींद्र सपकाळे व दुर्गेश ठाकूर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याचे मोबाइलमध्ये छायाचित्रण करून महावितरणला वीज चोरीबद्दल माहिती दिली. यानंतर महावितरणचे सहायक अभियंता पंकज वाघुळदे व अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी नेब कॉलनी गाठली. त्यांना वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी पंचनामा करुन संबंधीत कामावरील सुपरवाझर नितीन खलसे यांच्या नावाने ५ हजार ७०० रुपयांचे वीज बील दिले. २८ जानेवारीपर्यंत ही रक्कम न भरल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. मात्र, महावितरणने ठेकेदाराच्या नावे नव्हे तर सुपरवायझरच्या नावे दंड का दिला हा प्रश्न जनआधारने उपस्थित केला आहे.