ट्रॅक्टर परेडनंतर १०० हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर पंजाबच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने हा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पंजाब मानवाधिकार संघटना या एनजीओने दावा केला की, २६ जानेवारी रोजी मोगा येथील तातारुवाला गावातून १२ शेतकरी बेपत्ता झाले. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, खलरा मिशन, पंथी तालमेल संघटना यांच्याशिवाय पंजाब मानवाधिकार संघटना यांच्याशिवाय विविध संघटनांनी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे.

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराबाबत आजवर १८ आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात पश्चिम विहार पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या १८ पैकी सात जण पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील आहेत. अटक झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी २३ जानेवारी रोजी आपलं घर सोडलं होतं. घरातून दोन ट्रॅक्टर घेऊन निघाले होते.

दिल्लीच्या शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले, मोगाच्या ११ आंदोलकांना नांगलोई पोलिसांनी अटक केली. त्यांची आता तिहार तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे. अलीपूर आणि नरेला भागात देखील अटकसत्र राबवण्यात आलं. भारतीय किसान युनियन (राजेवाल) गटाचे प्रमुख बलबीर सिंह राजेवाल यांनी म्हटलं की, शेतकरी संघटना प्रजासत्ताक दिनी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करत आहेत.

Protected Content