चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफॉर्मर मधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाखांची तांब्याची तार व प्लेटा चोरी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून इसमाला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी नामे सचिन केशवराव नागरे रा. हिरापुर रोड, चाळीसगांव यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चाळीसगांव शहर पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांनी म्हटले आहे की, माझ्या भागिदारी कंपनीत असलेली मॉर्निसा बायो ऑर्गनिक प्रायव्हेट लिमेटेड, चाळीसगांव मधुन कोणतरी अज्ञात इसमांनी ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार व प्लेटा तसेच आरमाड केबल असा एकुण ४,१०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत तक्रार दिली आहे. सदर गुन्ह्याचे तपास पोना दिपक पाटील हे करीत होते.
त्यांना तपासादरम्यान गुप्त माहीती मिळाली की, चाळीसगांव येथील रहिवाशी असलेले अहमद शेख ईस्माईल (वय-२७) व सलमान बेग हुसेन बेग (वय-२६) दोन्ही रा. जहागिरदारवाडी, चाळीसगांव यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे. त्यावर पोना दिपक पाटील, सफौ शशिकांत महाजन, पोहेकॉ योगेश बेलदार, नितीन वाल्हे, पोकॉ भरत गोराळकर, अमोल पाटील, नंदकिशोर महाजन, अजय पाटील, अमोल भोसले या पथकाने सदर आरोपीतांचा शोध घ्यायला सुरुवात केली. व सापळा रचून त्यांना नमुद गुन्ह्यात अटक केली.
सदर आरोपीतांचा कोर्टाकडुन पोलीस कस्टडी घेतली असता त्यांच्याकडुन चोरीस गेलेल्या मालापैकी १,०४,६९० रुपये किमतीच्या १४५ फुट आरमाड केबल जप्त करण्यात आलेली असून उर्वरीत मुद्देमाल जप्त करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले आहे.
सदर कार्यवाही सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.