ट्रम्प यांची निवडणुकीचा निकाल मान्य करण्याची तयारी

 

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास व्हाइट हाउस सोडणार नसल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. आता ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने होणे आवश्यक असल्याची अट त्यांनी टाकली आहे. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅली मॅकनॅनी यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान टाळून टपालाद्वारे मतदान करण्यासाठी देशातील अनेक प्रांत आग्रही असल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानाच्या या पद्धतीवरच शंका उपस्थित केली होती. ‘टपाली मतदानाच्या विरोधात मी अनेकदा तक्रार केली आहे. या निवडणुकीत माझा पराभव झाल्यास मी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईन,’ असे ट्रम्प यांनी जाहीर केले. यामुळे ट्रम्प यांचा विरोध झाल्यास अमेरिकेतील सत्ताहस्तांतर संघर्षमय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

निवडणूक निकाल विरोधात लागल्यास तो स्वीकारणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, कॅली यांनी ट्रम्प यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. स्वतंत्र आणि निष्पक्षपणे निवडणूक झाल्यास तो निकाल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्विकारतील. मात्र, डेमोक्रेटीक पक्षाचे नेते निवडणूक निकाल स्वीकारणार नाही असे म्हणत आहेत. माध्यमांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे कॅली यांनी सांगितले.

व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेत अध्यक्ष ट्रम्प यांना पत्रकारांनी सत्ता हस्तांतराबाबत प्रश्न विचारला. त्यावर थेट व स्पष्ट उत्तर देणे ट्रम्प यांनी टाळले; मात्र, टपाली मतदानावर त्यांनी पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला. करोनामुळे अमेरिकेत आत्तापर्यंत दोन लाख नागरिकांनी जीव गमावले आहेत. त्यामुळे ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी गर्दी होऊ नये, यासाठी अनेक राज्ये टपाली मतदानाचा पर्याय पडताळून पाहात आहेत.

‘तुम्ही निवडणूक जिंकलात, हरलात किंवा बरोबरी झाली तरी तुम्ही शांततापूर्ण मार्गाने सत्ता हस्तांतर करण्याची ग्वाही द्याल काय,’ असा प्रश्न एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारला. यावर, ‘निवडणुकीत काय होते, ते बघू,’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. त्यावर पुन्हा एकदा पत्रकाराने ‘लुइसविले व इतर अनेक शहरे दंगलीत होरपळत आहेत. राज्ये लाल आणि निळ्या रंगांत विभागली गेली आहेत.

आज तुम्ही अमेरिकी जनतेला सत्ता हस्तांतराबाबत ग्वाही द्याल का,’ असा सवाल पुन्हा केला. त्यावर ‘टपाली मतदानाबाबत माझा गंभीर आक्षेप आहे. हे मतदान म्हणजे आरिष्ट्य आहे. त्यामुळे टपाली मतदानाचा पर्याय रद्द करणे आवश्यक आहे. हे मतदान अनियंत्रित होऊ शकते आणि हे डेमोक्रॅटना चांगले ठाऊक आहे,’ असा आरोपही ट्रम्प यांनी केला. त्याही पुढे जाऊन, ‘माझा पराभव झाल्यास न्यायालयात जाईन,’ असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते.

‘निवडणुकीत गडबड झाली, तरच जो बायडन जिंकू शकतात,’ असे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. अनेक मतदानपूर्व चाचण्यांनी ट्रम्प पिछाडीवर असल्याचा निष्कर्ष काढला आहे. काही प्रमुख प्रांतांत निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचा कयास आहे.

Protected Content