नवी दिल्ली : वृत्तसंस्था । २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तानचे संघ एकमेकांशी मैदानात भिडणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, आयसासीकडून काही दिवसांमध्येच टी-२० वर्ल्डकपसाठी स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर केले जाणार आहे.
आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीकडून मागली महिन्यात गटांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार भारत व पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर या कट्टरप्रतिस्पर्धी संघ प्रत्यक्ष आमने-सामने कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना, आता याबाबतची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
आयसीसी अंतिम वेळापत्रकावर निर्णय घेण्याअगोदर साधारणपणे दोन ते तीन सेट ठेवत असते, मात्र भारत-पाकिस्तान मॅचची लोकप्रियता पाहता ही मॅच आठवड्याच्या शेवटी निश्चत केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात माहिती असणारे आयसीसी बोर्डाच्या एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले की, आतापर्यंत रविवार २४ ऑक्टोबरच्या पर्यायाची शक्यता आहे, कारण पहिल्या आठवड्यातील क्वालीफाइंग मॅच १७ ऑक्टोबरपासून ओमानच्या मस्कत येथे सुरू होईल. म्हणून जेव्हा मुख्य राउंड रोबिनचे सामने खेळवले जातील, तेव्हा भारत-पाकिस्तान मॅचने सुरूवात करणे चांगले राहील, जे टीआरपीसाठी सर्वोत्तम राहील.
जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेते न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यासह भारत आणि पाकिस्तान गट दोन मध्ये आहेत. तर, गट एक मध्ये वेस्टइंडिज, माजी विजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता. कोरोनामुळे टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल.