टीआरपी घोटाळा ३० हजार कोटींचा

 

मुंबईः वृत्तसंस्था । एका कर्कश वृत्तवाहिनीचा ३० हजार कोटींचा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी सर्व समोर आणलाय पोलिसांचे पाय आता कोणी खेचू नयेत,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

 

‘महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट्स समाज माध्यमांवर निर्माण केली. ‘सामना’तील रोखठोक सदरात मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्याविषयी राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं आहे.

‘सुशांतसिंह प्रकरण हे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कसं वापरण्यात आलं याचा स्पष्ट खुलासा आता झाला आहे. याबाबत स्वतःला नैतिकतेचे पुतळे समजणारे लोक दुसऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी स्वतः पांढरपेशी दरोडेखोर होतात व समाजातला एक वर्ग या दरोडेखोरीचं समर्थन करतो हे भयंकर आहे. कर्कश चॅनेलनं सुशांत प्रकरणात ज्या आरोळ्या ठोकल्या त्या त्यांच्याच घशात मुंबई पोलिसांनी घातल्या. हा एक आर्थिक घोटाळा आहे व टीआरपी वाढावा यासाठी घरोघरी पैसे वाटले गेले हा खुलासा पोलिसांनी केला आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री देशमुख व संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करुन चिखलफेक करण्यासाठी पैशाचा वापर झाला. हे पैसै नक्की कुठून आले, त्यांच्या बोलवता धनी आणि पैसे पुरवणारा धनी कोण हे स्पष्टपणे समोर आलं पाहिजे, पण चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. त्या चोरांना आता महाराष्ट्रानं सोडू नये,’ असं आवाहनचं संजय राऊत यांनी केलं आहे.

‘पोलीस आणि प्रशासन हे राष्ट्राच्या चार प्रमुख स्तंभांपैकीच एक आहेत. राजकीय फायद्यासाठी त्या स्तंभावरच घाव घालायचे ही मानसिकता धोकादायक आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर आणि इमानदारीवर या काळात मोठा हल्ला चढवला गेला. सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाउंट्स उघडून ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुकेत खाती बाहेरच्या देशांतून चालवली गेली हे समोर आलं. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यानं चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नाही,’ असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सीबीआचे माजी संचालक अश्निनीकुमार यांनी आत्महत्या केली यावर हे महाशय मुके झाले व टीआरपीसाठी त्यांनी या आत्महत्येचा विषय घेतला नाही. पाचशे रुपये वाटून फक्त आपले चॅनेल बघण्यासाठी जो घृणास्पद प्रकार झाला तो संपूर्ण देशाला काळिमा फासणारा आहे. ८० हजार फेक अकाउंट आणि ३० हजार कोटींचा टीआरपी घोटाळा याविरोधात सगळ्यांनी एकवटले पाहिजे. मुंबई पोलिसांनी ही कीड चिरडण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याचे पाय खेचणाऱ्यांनी देशहिताशी गद्दारी करु नये,’ असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Protected Content