शिवसेनेच्या धनुष्यबाणावर संयुक्त जनता दलाचा आक्षेप

मुंबई : वृत्तसंस्था । बिहारमधील सत्ताधारी जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष सत्तेत असून ‘बाण’ हे जदयूचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो आणि आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केला होता.

शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देऊ नये, अशी मागणीही जदयूने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली. बिहारमध्ये किमान ५० जागा लढविण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलिडर आणि बॅटपैकी एक निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतेच चिन्ह त्यांना मिळाले नाही. त्यांना बिस्किट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. शिवसेनेने बिस्किट हे निवडणूक चिन्ह देण्यावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिले असून निवडणूक आयोगाच्या उत्तराची शिवसेनेला प्रतीक्षा आहे.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुक शिवसेनेने एकूण २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेला २ लाख ११ हजार १३१ मते मिळाली होती. ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता.

Protected Content