मुंबई वृत्तसंस्था । भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अलीकडेच गायलेल्या एका गाण्यावरून प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आपली ही पोस्ट काहीही झाले तरी डिलीट करणार नसल्याचे टिळेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं त्यांनी हे गाणं गायलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून गाण्याला नेटकर्यांनी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, निर्माता महेश टिळेकर यांनीही एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या गाण्यावर टीका केली होती.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे आडात नसेल तर पोहर्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडेच आहे. आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.
दरम्यान, त्याला राजकीय वळण लागण्यास सुरूवात झाली. काही भाजप समर्थकांनी अमृता फडणवीस यांची पाठराखण करत टिळेकरांचा संबंध थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंशी जोडला. याच पार्श्वभूमीवर टिळेकरांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ट्रोर्लसना उत्तर दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, बेसूर गाणं आणि ते गाणार्या गायिकेच मी कौतुक न केल्यामुळ माझ्या पोस्ट मुळे अनेकांचे कान ठणकू लागले आहेत आणि त्यांना पोट दुखी पण सुरू झाली, त्यांचे पित्त उसळले आहे जे मला येणार्या कमेंट्स मधून समजलं.शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या बरोबरचे माझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्या गायिकेच्या चाहत्यांनी ,भक्तांनी बोंबलायला सुरुवात केली आहे. मात्र आपण पोस्ट डिलीट करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.