मुंबई | एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे सोपवली जाण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने तोट्यात असणार्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ’टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून आजपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे.
या संदर्भात टाटाच्या अधिकार्यांनी सांगितले की, सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाला गुरुवारी सोपविण्यात येणार आहे. दरम्यान, दोन एअरलाईन पायलट युनियन, इंडियन पायलट गिल्ड आणि इंडियन कमर्शियल पायलट असोशिएशनने एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक विक्रम देव दत्त यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याचे कारण वैमानिकांच्या थकबाकीवर अनेक कपाती आणि वसुली असल्यची शक्यता आहे.
शिवाय इतर दोन युनियनने उड्डाण होण्यापूर्वी विमानतळावर चालक दलाच्या सदस्यांचे बॉडी मास इंडेक्स मोजण्यासंदर्भात कंपन्यांनी २० जानेवारीला जो आदेश दिला होता, त्याचा विरोध केला आहे. इअर इंडिया कर्मचारी संघ आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने सोमवारी विक्रम देव दत्त यांना पत्र लिहून या आदेशाचा विरोध करत कंपनीचा हा आदेश अमानवीय आहे. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या नियमांचं उल्लंघन करणारे आहे, असे नमूद केले आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या सर्व अडचणींवर मात करून एयर इंडियाला उभारी देण्याचे आव्हान टाटा समूहासमोर असणार आहे.