मुंबई : वृत्तसंस्था । पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला . तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आलं असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहेत.
टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. ठाणे, कांजूर, भांडूपमधील अनेक भागांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दुपारपर्यंत मुंबईतील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.. ३८५ मेगा व्हॅट वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे अदानी समुहाने ट्विटरवरुन म्हटलं आहे.
मुंबईतील उपनगरीय वाहतूक सेवेलाही या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेचे प्रमुख प्रवक्त्यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त आहे.