नवी दिल्ली : वृत्तसंस्था । झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी फोन केला पण ऐकून न घेता फक्त स्वतःचंच सांगत बसले असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आपल्या या ट्विटमध्ये हेमंत सोरेन म्हणतात, “आज पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असतं”.
दुसऱ्या लाटेमध्ये झारखंड राज्यालाही संसाधनांचा तुटवडा भासत आहे. आपल्या अपेक्षित मदत मिळत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंग म्हणाले की, राज्याला रेमडेसिविर इंजेक्शनच्या फक्त २,१८१ कुप्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सिंग म्हणतात, “इतर कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. झारखंडला बांग्लादेशक़डून रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५०हजार कुप्या आयात करायच्या आहेत. मात्र, अजूनही परवानगी मिळालेली नाही”.
झारखंडमध्ये १.५७ कोटी लाभार्थ्यी लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण खोळंबलं आहे. झारखंड सध्या प्रतिदिन ६८० टन ऑक्सिजन निर्माण करत आहे, मात्र त्यांची गरज केवळ ८० टन आहे. मात्र, तिथे कन्टेनर्स, सिलेंडर्स आणि वेपराईझर्सचा तुटवडा आहे. याबद्दल मुख्यमंत्री सोरेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र, अद्याप ती मिळालेली नाही.