ज्वेलर्स दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावातील बाजारपट्टा भागात असलेले ज्वेलर्स दुकान फोडून एकूण ४५ हजार रूपये किंमतीचे मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रवींद्र रमेश आव्हारे (वय-३३, रा. चोपडे नगर, फत्तेपूर ता.जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे गावातील बाजारपट्टा भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ओम भगवती ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून दुकानातून चांदीच्या वस्तू तसेच बेन्टेक्स बांगड्या, इतर दागिने, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आला. त्यानंतर त्यांनी रात्री पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.

Protected Content