मुंबई (वृत्तसंस्था) करोना पसरू नये म्हणून आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. परंतू अत्यावश्यक सेवा कुठल्याही स्थितीत बंद करणार नाहीत, पण अनावश्यक व्यवहार बंद करावे लागतील. याबाबत पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी टोपे म्हणाले की, बाहेर देशातून आलेले आणि लक्षणं दिसली तरच टेस्ट केली जाणार आहे. करोना पसरू नये म्हणून आपण विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. करोनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील एनआयव्हीला भेट देणार असून आधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. राज्यात ८०० रूग्णांपैकी ४२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपचार सुरु असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून आणखी रिपोर्ट येणे बाकी असल्याचे टोपे यांनी सांगितले. करोनाचा आजार बरा होणारा आहे. संशयित रूग्णांसोबत दुजाभाव करू नये, असे अवाहनही यावेळी त्यांनी केले आहे.