मुंबई : वृत्तसंस्था । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर तीन दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या कारची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली आहे. ही नवीनच संघटना असून त्या बद्दल फार माहिती नाहीय.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाबाहेरची स्फोटकांनी भरलेली कार ‘फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे’ असे जैश-उल-हिंदने टेलिग्राम अॅपवरील संदेशात म्हटले आहे. “अंबानी यांच्या घराजवळ कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. हा फक्त एक ट्रेलर होता. अजून मोठे चित्र समोर यायचे आहे” असे जैश-उल-हिंदने म्हटले आहे.
जैश-उल-हिंदने बिटकॉईनच्या स्वरुपात पैसा मागितला आहे. ‘तुम्हाला जमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा’ असे तपास यंत्रणांना आव्हान देण्यात आले आहे. “आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुमच्या मुलांच्या कारला धडक बसेल” अशी धमकी सुद्धा या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. “तुम्हालाा काय करायचे हे तुम्हाला माहित आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा” अशी धमकी मेसेजमधून देण्यात आली आहे.
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. स्फोटक साहित्य सापडल्यानंतर कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कमांडोही तैनात करण्यात आले आहेत.