नवी दिल्ली वृत्तसंस्था । भाजपचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असून यावर २० जानेवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बढती मिळण्याची शक्यता असून ते या पदासाठी सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी बिनवरोध निवड होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपणार आहे. त्यामुळे पक्षाचे ११ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डा यांचीच बिनविरोध निवड घोषित केली जाईल अशी शक्यता आहे. नड्डा हे राज्यसभेचे खासदार असून पक्षाच्या संसदीय बोर्डाचे सचिव आहेत. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी घेत तेथील ८० पैकी ६२ जागा पक्षाला जिंकून दिल्या. यानंतर जून २०१९ मध्ये ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. आता त्यांना बढती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.