पुणे : वृत्तसंस्था । सीरम इन्स्टिट्यूटकडून नोवाव्हॅक्स कंपनीच्या सहकार्याने आणखी एक लस भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. ‘कोवोव्हॅक्स’ या स्थानिक नावाने जून २०२१ पर्यंत ही लस बाजार येईल, अशी घोषणा अदर पुनावाला यांनी केली आहे.
या लसीच्या चाचण्याही प्रभावशाली असल्याचे नोवाव्हॅक्सने सांगितल्याचे पुनावाला यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या सहकार्यानं सीरमने ‘कोव्हिशिल्ड’ ही लस बाजारात आणली असून भारतात त्याचे लसीकरणही सुरु झाले आहे.
नोवाव्हॅक्स आयएनसीनं नुकतंचं जाहीर केलं होतं की, ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक चाचणीत त्यांची लस ८९.३ टक्के प्रभावी ठरली आहे. ही लस प्राथमिक विश्लेषणात ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी ठरली आहे.
पुनावाल यांनी ट्विट करत म्हटलं की, “सीरमसोबत भागीदारीत काम करत असलेल्या नोवाव्हॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्यांचे चांगले परिणाम आले आहेत. भारतातही याच्या चाचण्या सुरु करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. दरम्यान, जून २०२१ पर्यंत कोवाव्हॅक्स नावानं ही लस बाजारात येईल.
नोवाव्हॅक्सने यापूर्वीच सहा लस निर्मिती स्थळांवर आपल्या लसीचा साठा करुन ठेवला आहे. सात देशांमधील त्यांच्या आठ प्लांटमध्ये या लसीचे दरवर्षी २ बिलियन डोस तयार केले जाणार आहेत. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे.