जुने ३० हजार कर्मचारी काढून नवे १४ हजार भरणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जुन्या ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करून त्यांच्या जागी नवे १४ हजार कर्मचारी भरण्याची खर्च कपातीची योजना स्टेट बँक ऑफ इंडियाने आखली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियातील स्वेच्छानिवृत्तीच्या योजनेने कर्मचारी वर्गात काळजीचे वातावरण निर्माण केले होते. ‘सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस २०२०’ असे नाव असलेल्या या योजनेचा लाभ ३०,१९० कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, असे बँकेने म्हटले होते. ही योजना कॉस्ट कटिंगसाठी असल्याचे चर्चा होती. आता बँकेने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

बँक विस्तार करणार आहे. त्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज असेल. यासाठीच बँक या वर्षी १४ हजार नवे कर्मचारी भरती करून घेणार आहे. सध्या बँकेकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतला आहे. देशातील युवकांना देखील संधी देण्यात बँकेने पुढाकार घेतला आहे. एसबीआय ही देशातील एकमेव बँक आहे जी नॅशनल आपरेंटिसशिप स्किमीनुसार युवकांना काम देते, असे बँकेने म्हटले आहे.

स्वेच्छानिवृत्तीखेरीज ज्या कर्मचाऱ्यांना बँकेत सर्व प्रकारचे लाभ मिळाले आहेत, ज्यांना नोकरीत यापुढे राहण्यात वैयक्तिक समस्या येत आहेत व जे कर्मचारी आपल्या कारकीर्दीत साचलेपण अनुभवत अशा कर्मचाऱ्यांना नोकरीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यासाठीही सन्माननीय तोडगा बँकेने देऊ केला आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना बँकेत २५ वर्षांची नोकरी झालेल्या किंवा वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असणार आहे. ही योजना १ डिसेंबरपासून खुली होणार असून ती पेब्रुवारी २०२१ पर्यंत खुली राहणार आहे.

Protected Content