जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजनेसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. आज सातव्या दिवशी जामनेर येथील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी यांनी सोमवारी २० मार्च रेाजी सकाळी १० वाजता सहकुटुंबासोबत आयोजित भव्य मोर्चात सहभाग नोंदविला होता.
जामनेर तालुक्यात जुनी पेन्शन योजना मागणीसाठी सुमारे दोन हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सातव्या दिवशी जामनेर तालुक्यातील शिक्षक, ग्रामसेवक, कृषी विभाग, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग आदी विभागातील सुमारे २ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह भव्य मोर्चा शहरातून काढला. यावेळी टाळ मृदुंग वाजवत ‘एकच पेन्शन जुनी पेन्शन’ अशा घोषणा देण्यात आल्या. जोपर्यंत शासन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही. तोपर्यंत संप मागे घेणार नाही. असा पवित्रा आता संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेकडून या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून मात्र आजपर्यंत कोणतेही नोटीस संपकऱ्यांकडे पोहोचलेली नाही. या संपाचा जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संपाबाबत शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.