जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी समृद्ध भाषा मराठी -प्रा.डॉ.आशालता महाजन

भुसावळ  प्रतिनिधी । कर्म आणि भक्तीत रमणाऱ्या मराठी भाषेत नवशक्तीचे सामर्थ्य असून शब्दभांडार व सर्जनशीलतेची समृद्धी आहे. लोकशक्ती, ज्ञानशक्ती व राजशक्ती एकत्र आल्यास ज्ञानभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकेल. जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी समृद्ध भाषा मराठी भाषा असल्याचे प्रतिपादन  येथील नाहाटा महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्य प्रा.डॉ. आशालता महाजन यांनी केले.

जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ऑनलाईन व्याख्यानात डॉ. महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगून मातृभाषेचे महत्त्व प्रतिपादन केले. त्यानंतर कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. आशालता महाजन यांना डॉ. जगदीश पाटील यांनी मोबाईलवर कॉल करून विद्यार्थ्यांची संवाद साधण्याची विनंती केली. डॉ. महाजन यांनी मोबाईलवर ऑनलाईन व्याख्यान देवून सुमारे अर्धा तास विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल माहिती दिली. मराठी भाषा निर्व्याज प्रेम करणारी असून ती महाराष्ट्राचा प्राण आहे. ती प्रखर, तेजस्वी, हळवी, मोहिनी, लोभस व सालसही आहे. अशा या मराठी भाषेत भजन, कीर्तन झाल्याने ही कर्म व भक्तीतही रंगली. अशा समृद्ध असणाऱ्या मराठी भाषेचा अभिमान व स्वाभिमान मनात सदैव बाळगला पाहिजे. त्यासाठी आचार-विचार मातृभाषेत मांडावे. काव्यवाचन, कादंबरी, नाटक, कथावाचन, पुस्तके वाचन केले पाहिजे. मराठीत खूप मोठे ज्ञानभांडार आहे. पत्रलेखनाचा आनंद वेगळा असल्याने पत्र लिहायला शिकले पाहिजे. मराठी भाषेला रुजवून व फुलवून आपण तिला वसंत ऋतूचा बहर आणला पाहिजे, असेही आवाहन डॉ. महाजन यांनी करून कवी कुसुमाग्रज व सुरेश भट यांच्या मराठी भाषेविषयीच्या कविता सादर केल्या. त्यानंतर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताचे समूहगान करण्यात आले. मुख्याध्यापक देविदास वाल्हे व डॉ. जगदीश पाटील यांनी माझी मराठी, माय मराठी अशा विविध घोषणा दिल्या. सुनंदा  निंभोरे यांनी मी मराठी बोलणारच अशी शपथ दिली. तसेच इयत्ता आठवीच्या वर्गात गे मायभू तुझे मी या कवितेचे  विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक देविदास वाल्हे यांनी केले. यशस्वीतेसाठी रमेश सूर्यवंशी, विनोद जयकर, साधना सूर्यराव, मंजुषा पाठक, सविता निंभोरे, डॉ. जगदीश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content