जीएसटी महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।: सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारला वस्तू आणि सेवा करातून १.०४ लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. सलग दोन महिने कर महसूल एक लाख कोटींच्या पुढे गेल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.

अजूनही काही राज्यांमध्ये करोनाचे निर्बंध आहेत, मात्र तरीही कर महसुलात वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा जीएसटी महसूल १.४ टक्क्यांनी वाढला असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्यात १.०५ लाख कोटी जीएसटी स्वरूपात मिळाले होते.

गेल्या महिन्यात सणासुदीचा हंगाम होता. या काळात ई कॉमर्स कंपन्यांनी सेलच्या माध्यमातून बम्पर विक्री केली. त्यामुळे आर्थिक चलन उलाढाल वाढली. गेल्या महिन्यात आयत केलेल्या वस्तूंवरील कर उत्पन्नात ४.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात कर महसूल १ लाख कोटींपार गेल्याने अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे मागील आठ महिन्यांच्या टाळेबंदीत झालेले कर महसूल नुकसान भरून निघण्यास मदत होईल, असे मत कर तज्ज्ञ अभिषेक जैन यांनी व्यक्त केले.

नोव्हेंबरमध्ये सरकारला जीएसटीतून १०४९६३ कोटी मिळाले आहेत. ज्यात सेंट्रल जीएसटीसाठी १९१८९ कोटी, स्टेट जीएसटीसाठी २५५४० कोटी, इंटिग्रेटेड जीएसटीसाठी ५१९९२ कोटी आणि सेसम्हणून ८२४२ कोटी मिळाले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ८२ लाख जीएसटी रिटर्न सादर करण्यात आले.

नुकताच जीडीपीचे आकडे जाहीर झाले. दुसऱ्या तिमाहीत आर्थिक कामगिरी पहिल्या तिमाहीचे तुलनेत चांगली ठरली आहे. विकासदर अजूनही उणे स्तरावर असला तरी त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे शेअर दलालांनी सांगितले. केंद्र सरकारने शुक्रवारी दुसऱ्या तिमाहीची विकासदराची आकडेवारी जाहीर केली. ज्यात जीडीपी उणे ७.५ टक्के राहिला. पहिल्या तिमाहीत तो उणे २३.९ टक्के होता

Protected Content