जळगाव प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार विनापरवानगी शहरात येऊन दहशत माजवत असल्याने पोलिसांनी त्याला अटक केले होते. या खटल्यात न्यायालयाने मंगळवारी या गुन्हेगारास सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
किरण शंकर खर्चे (रा.सुप्रीम कॉलनी) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. खर्चे याच्या विरुद्ध चोरी, हाणामारी, प्राणघातक हल्ला असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी पाठवलेल्या अहवालनुसार सन २०१७ मध्ये प्रांताधिकाऱ्यांनी त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. सन २०१९ पर्यंत त्यास जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई होती. असे असतानाही खर्चे हा सन २०१८ मध्ये विनापरवानगी शहरात दाखल झाले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातात तलवार घेऊन तो दहशत माजवत होता. यामुळे पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयात दोषारोप दाखल केल्यानंतर खटल्यास सुरूवात झाली. या खटल्यात सरकारपक्षाने पोलिस कर्मचारी आनंदसिंग पाटील, सतीष गर्जे यांच्या साक्ष घेतल्या. सुनावणीअंती मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीनाथ फड यांनी खर्चे याला दोषी ठरवुन शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड.निखील कुलकर्णी यांनी काम पाहिले.