जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या दोन हजाराहून अधिक चाचण्या

जळगाव, प्रतिनिधी। जिल्ह्यात कोरोनाच्या गेल्या चोवीस तासात सुमारे 2072 इतक्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 63 हजार 146 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण दहापटीने वाढले आले आहे. अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्हाधिकरी श्री. राऊत म्हणाले की, मे अखेरला जिल्ह्यात दैनंदिन 200 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु आता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गेल्या दोन महिन्यात तपासणीची साधने वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीमध्ये दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात 11 व्या स्थानी पोहोचला असून जिल्ह्यात 7 ऑगस्ट रोजी 1911 तर 8 ऑगस्ट रोजी 2072 अशा एकूण 3983 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड ॲटिजेन चाचण्यांची संख्या 2337 तर आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 1645 इतकी आहे. सध्या राज्यात दैनंदिन सर्वाधिक 12402 चाचण्या नाशिक जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन दोन हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्या केल्याने बाधित रुगण शोधण्यास मदत होत असून कोरोनाची साखळी खंडित करण्यात मदत होणार आहे.

कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्ण शोधण्यास मदत होत असल्याने अशा बाधित रुगणांवर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होणाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्यासही मदत झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत (8 ऑगस्ट) 13 हजार 887 बाधित रुगण आढळून आले असून त्यापैकी 9 हजार 588 इतके रुग्ण म्हणजेच 69 टक्के रुग्ण बरे झाले आहे. तर सध्या जिल्ह्यात फक्त 3 हजार 698 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत 601  बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी 12 टक्के असलेला मृत्युदर सध्या केलेल्या विविध उपाययोजनांमुळे 4.32 टक्क्यांवर आणण्यात प्रशासनास यश आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले.

जिल्ह्यातील नागरीकांना कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. त्याचप्रमाणे बाहेर पडतांना मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

Protected Content