जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीत जिल्ह्यातील ९५ पैकी ९४ रिपोर्ट निगेटीव्ह आढळून आले असून जळगावातील एक महिला कोरोना बाधीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबतची माहिती अपडेट केलेली आहे. यानुसार-भडगाव, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 95 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
पैकी 94 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील 30 वर्षीय महिला आहे.
यातील बहुतांश संशयित हे कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेले होते. त्यांचे नमुने निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. तर जळगावात मात्र कोरोनाचा प्रकोप वाढतांना दिसत आहे. आज एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या ६७ झालेली आहे.