जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत ८ एप्रिलपासून जिल्ह्यात गॅरेज, स्पेअरपार्टची विक्री करणारी दुकाने आणि कृषी उपकरणांची दुरूस्ती करणारी दुकाने उघडणार असून आज जिल्हाधिकार्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
जिल्ह्यात देशव्यापी लॉकडूनचे पालन करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, धाबे, रिसॉर्ट, फॉर्म हाऊस, रेस्टॉरंट, खानावळी, लॉजिंग, आईसक्रीम पार्लर, सर्व प्रकारची शीत पेयांचे गाडे व दुकाने ( उदा. लिंबू/ सोडा सरबत, बर्फाचे गोळे, आईसकँडी, ऊसाचे रस इ. तत्सम सर्व ) तसेच सर्व प्रकारचे खाद्य पदार्थांचे गाडे ( उदा. चहा, वडा/ भजी पाव, चायनीज, पाणी पुरी इ. तत्सम सर्व) सर्व प्रकारचे सोने- चांदीचे दुकाने, कापड, ऑटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, हार्डवेअर, प्लायवुड, मोबाईल, सलून, ब्यटी पार्लर, फटाके, गॅरेज, स्विट मार्ट, व्हिडीओ गेम्स, सायबर कॅफे, व्हिडीओ पार्लर, साहसी खेळांचे ठिकाणी, वॉटर पार्क्स व कला केंद्रे इत्यादी सर्व प्रकारचे करमणुकीची व खेळाची केंद्रे आणि क्कल्ब (जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकाने, औषधालय, फळे, भाजीपाला, दुध विक्री दुकाने, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, अंत्यविधी (गर्दी टाळून) व प्रसार माध्य कार्यालये वगळून) पुढील आदेश होईपावेतो पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, भारत सरकार यांचेकडील आदेश दिनांक ३ एप्रिल, २०२० अन्वये कृषीसाठी उपयोगात येणारे यंत्रसामग्री, त्यांचे स्पेअर पार्ट व ते दुरुस्त करणार्या संबंधित आस्थापना, हायवेवरील (विशेषत: पेट्रोल पंपावरील ) ट्रक व तत्सम मालवाहू वाहने दुरुस्ती करणारे गॅरेजेस/ दुकाने, चहा लागवड/उद्योग यांचेशी संबंधित आस्थापना ( ५० टक्के कर्मचारीसाठी ) इत्यादी बाबी वगळण्यात आलेल्या आहेत. यामुळे कृषीसाठी उपयोगात येणारे यंत्रसामग्री, त्यांचे स्पेअर पाट्रर्स व ते दुरुस्त करणार्या संबंधित आस्थापना, हायवे वरील (विशेषत: पेट्रोल पंपावरील) ट्रक व तत्सम मालवाहू वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करणारी दुकाने/ त्यांची दुरस्ती करणारे गॅरेजेस, चहा लागवड/उद्योग यांचेशी संबंधित आस्थापना (५० टक्के कर्मचारीसाठी) इत्यादी बाबी वगळण्याबाबतची मंजुरी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. दरम्यान, या आदेशाचे उल्लघन कोणत्याही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता १८६०(४५) चे कलम १८८ व मुबंई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ४३ नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.