जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा व्यसनमुक्त करावा तसेच दारू दुकानांवरील ‘सरकारमान्य’ हा शब्द काढून टाकावा, यासह गांजा तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे या आशयाचे निवेदन चेतना व्यसनमुक्ती केंद्रसह विविध सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाला सोमवारी ३० जानेवारी रोजी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कुठलेही व्यसन करणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी नेहमी घातक असते. त्यातही गुटखा, तंबाखू यासह दारूचे व्यसन हे खूप धोकादायक असते. महात्मा गांधी यांचा स्मृतिदिनानिमित्त आपणास विविध संस्थांतर्फे मागणी करण्यात येत आहे. जळगाव जिल्हा हा व्यसनमुक्त करावा यासाठी विविध आराखडा तयार करून त्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतला पाहिजे. जेणेकरून जिल्हा व्यसनमुक्ती व्हावा यासाठी अधिकाधिक प्रयत्न करता येईल.
व्यसनांमुळे गरिबांसह अनेक घरांची राखरांगोळी झालेली आहे. कुटुंबांची वाताहत थांबवण्यासाठी, जिल्हा व्यसनमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले पाहिजे, अशी विनंती आहे. तसेच सर्व दारू दुकानावरून “सरकार मान्य” हा शब्द वजा केला पाहिजे. “सरकारमान्य” याचा अनेक जण चुकीचा अर्थ लावत आहेत. त्यामुळे सरकारने हा शब्द दुकानांवरून काढून टाकण्याबाबत आपण आदेश द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
यासह जळगाव जिल्ह्यामध्ये विविध राज्यातून होणारी गांजांची तस्करी थांबली पाहिजे. तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. याबाबत जिल्हा पोलीस दलाशी चर्चा करून याबाबत कठोर कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते, प्रवीण पाटील फाउंडेशनचे प्रा. प्रवीण पाटील, मयूर पाटील, मराठी विज्ञान परिषदचे सचिव दिलीप भारंबे, शशिकांत नेहते सोबत रवी सोनार, उमेश कापसे, महेंद्र सपकाळे, आशिष पाटील, महेंद्र अहिरे, प्रतीक सोनार, गणेश काकडे यासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.