जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा सर्वोत्तम; केंद्रीय तपासणी पथकाकडून कौतूक

जळगाव प्रतिनिधी ।  रुग्णांना मिळणा-या सोयीसुविधा, आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा उत्तम असून राज्यातील आदर्श रुग्णालय म्हणून नक्कीच  गौरव करता येईल, अशा भाषेत केंद्रीय तपासणी समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कौतुक करीत माहिती जाणून घेतली. 

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय तपासणी पथकाने बुधवारी १० मार्च रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पथकाचे स्वागत केले. प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, “शावैम” चे प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित होते. 

केंद्रीय तपासणी पथकात दिल्ली येथील डॉ. पी. रवींद्रन, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संकेत कुलकर्णी, डॉ.प्रदीप आवटे यांचा समावेश होता. त्यांनी अधिष्ठाता दालनात अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांना रुग्णालयातील कोरोना रुग्णांविषयी माहिती दिली. त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधा पाहून पथकाचे सदस्यांनी समाधान व्यक्त केले. अत्यंत सुटसुटीत, स्वच्छ असे कोरोना रुग्णांचे केलेले व्यवस्थापन पाहून पथकाने कौतुक केले. कोरोना नियंत्रणाबाबत टिप्स देऊन रुग्णसंख्या कशी नियंत्रित राहील याची माहिती पथकाच्या सदस्यांनी दिली. 

तसेच शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी काय व कशा पद्धतीने उपाययोजना केल्या याबाबतची सविस्तर माहिती अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून घेतली. रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविणारा अनुभवी  व तरुण स्टाफ  पाहून पथकाने कौतुक केले. त्यांनी राज्याच्या सचिवांशी संवाद साधत जळगावच्या “जीएमसी” ला मुबलक मनुष्यबळ पुरवावे अशा सूचना करीत कामाबाबत  समाधान व्यक्त केले. बेड साईड असिस्टंट उपक्रमाचे कौतुक देखील करण्यात आले. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा चादरी, बेडशीट, उशी, नाश्ता, जेवण, औषधे या अत्याधुनिक स्वरूपात  देत असल्याचे पाहून ते थक्क झाले. सी टू  कक्षात तर एक्स रे मशीन देखील बसविण्यात आले आहे. तत्काळ निदान, तत्काळ उपचार या तत्वावर कोरोना रुग्ण बरे केले जात आहे. 

आयसीयू वॊर्ड देखील पथकाने सीसीटीव्हीच्या द्वारे पाहिला. यात जागच्या जागी असलेली उपकरणे, रुग्णांना मिळत असलेली ऑक्सिजन व व्हेंटिलेटरसह  वैद्यकीय सेवा हि खूप महत्वाचे असल्याचे सांगत “शावैम” हे राज्यातील सर्वोत्तम रुग्णालय असल्याबाबत गौरव केला. यावेळी उप वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. इम्रान पठाण, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले, कोविड इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, अधिसेविका कविता नेतकर, दिलीप मोराणकर, अनिल बागलाणे आदी उपस्थित होते.

Protected Content