जिल्हा परिषदेसमोर रिपाइंचे बोंबाबोंब आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरिबांना शासकीय योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे, भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेचे समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, रावेर व यावल तालुक्यातील गोरगरिबांना न्याय मिळावा, यासाठी अनेक वेळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शासनाला निवेदन दिले होते. रावेर व यावल तालुक्यातील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. यामुळे गोरगरिबांना शासकीय योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाचा दुरुपयोग करत असताना दिसून येत आहे.

अधिकारी व कर्मचारी यांच्या अडमुठेपणामुळे गोरगरिबांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी २७फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेच्या समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजेश सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे विकी तायडे, ईश्वर इंगळे, सुपडू सदाशिव, विष्णू पारदे, सुनील तायडे, राजू तडवी, पप्पू भालेराव, कमलाकर गाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content