जिल्हा दूध संघाच्या १९ जागांसाठी शनिवारी मतदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळासाठी शनिवार दि. १० डिसेंबर रोजी मतदान तर मतमोजणी रविवार ११ डिसेंबर रोजी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यातील ७ केंद्रांवर पार पडणार असून जळगाव येथे मतमोजणी केली जाणार आहे.

 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या १९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या १९ जणांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी ४४१ मतदार पात्र असून ते १९ जणांना मतदान करतील. गुरुवार दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचार करता येणार असून प्रचार शिगेला पोहचला आहे.  शनिवार दि. १० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ७ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात  अमळनेर व चोपडाच्या ७८ मतदारांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतदान केंद्र असणार आहे. भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरच्या ४४ मतदारांसाठी म्युन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड भुसावळ हे मतदान केंद्र असणार आहे. चाळीसगावच्या ५९ मतदारांसाठी हिरुभाई हिमाभाई पटेल प्रथमिक विद्यालय चाळीसगाव हे मतदान केंद्र असणार आहे. एरंडोल, धरणगाव व पारोळाच्या ६७ मतदारांसाठी एरंडोल येथील सूर्योदय जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, दत्त कॉलनी हे असणार आहे. रावेर यावलच्या ६० जागांसाठी म्युन्सिपल हायस्कूल अँँड ज्युनिअर कॉलेज फैजपूर येथे मतदान होणार आहे.   जळगाव व जामनेरच्या ५७ मतदारांसाठी मतदान केंद्र जळगाव येथील रिंग रोडवरील श्री सत्यवल्लभ हॉल हे असणार आहे. तर पाचोरा, भडगावच्या ७६ मतदारांसाठी श्री गो. से. हायस्कूल पाचोरा येथे मतदान केंद्र असणार आहे. दुसऱ्या दिवशी ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जळगाव येथे श्री सत्यवल्लभ हॉल येथे मतमोजणी करण्यात येणार आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी कळविले आहे.

 

Protected Content